अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांचा थेट सहभाग; नाना पटोले यांचा खळबळजनक दावा

मुंबई | महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात राज्यातील चार मंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. खरातकडून सर्व माहिती काढून घेतल्यानंतर त्याची हत्या केली जाईल, अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली आहे.
नाना पटोले यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “अशोक खरात प्रकरणात सहभागी असलेल्या चार मंत्र्यांच्या नावांचे पत्र मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून, त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे,” असे पटोले म्हणाले. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बऱ्याच झाला असून, भीती नावाचा प्रकार संपल्यामुळेच राजकीय गुंड आणि भोंदू बाबांचे पेव फुटले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा
कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आमदार महेश लांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. सध्या केवळ ‘छोटे मासे’ समोर आले असून अनेक बड्या व्यक्तींची नावे तपासातून वगळण्यासाठी मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील १ टक्का सत्यही अद्याप बाहेर आलेले नाही आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा अशी मागणी करताना रोहित पवार यांनी माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीवरून उपरोधिक टोला लगावला. मोठ्या रकमा घेऊन अनेकांना या प्रकरणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला असून, तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





