“स्मृतींच्या गंधात पुन्हा भेटलो…!” स्वामी विवेकानंद विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात!
बालपणीच्या आठवणींचा भावनिक प्रवास, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट!

पिंपरी-चिंचवड | “अशी पाखरे येती, स्मृती ठेवली जाती…” या कवितेच्या ओळींसारखाच वातावरणात, सहयोगनगर येथील श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात २००८च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी, नवनगर शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष प्रा. गोविंदराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संचालक अभिषेक दाभाडे, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, तसेच शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मार्गदर्शक आणि विविध बॅचमधील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : जागतिक स्पर्धेत नवनवीन कौशल्य गरजेची; चोयोन निओगी
“या चिमण्यांनो परत फिरा…” या हाकेला ओ देत विद्यार्थ्यांनी आपल्या लहानपणीच्या वर्गखोलीत पुन्हा प्रवेश करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक बांधिलकी जपत, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यालयाला ब्लॅकबोर्डच्या स्वरूपात देणगी दिली. यामुळे त्यांचा संस्थेबद्दलचा ऋणानुबंध अधोरेखित झाला. मेळाव्याला विशेष गती देताना, माजी विद्यार्थी प्रतिनिधी सुरज पांढरे, परशुराम कांबळे, सत्यवान यादव, रोहित सोनवणे, अय्याज शेख, तसेच उपसरपंच सुकन्या जगदाळे, पूजा आरगडे, आलका सूर्यवंशी यांनी मोलाची भूमिका बजावली.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासात योगदान द्यावे…
शाळेचे प्रवेशद्वार माजी विद्यार्थ्यांसाठी सदैव खुले असल्याचे सांगून, प्रा. गोविंदराव दाभाडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गीत गायन करून केली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनाप्रधान आठवणी व मनोगत व्यक्त करत, एकमेकांना नव्याने भेटण्याचा आनंद साजरा केला. दोन दिवसांचा हा स्नेहमिलन सोहळा आठवणींच्या सुवासाने दरवळत राहिला.





