नारीशक्तीच्या हक्कासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा बुलंद एल्गार
'महिलांचा अपमान करणाऱ्यांना महिलाच अद्दल घडविणार..!': प्रा. सोनाली गव्हाणे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : महिलांच्या हक्कांचे प्रतीक असलेल्या ‘नारी-शक्ती वंदन अधिनियम’ विधेयकाला संसदेत काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी / इंडी आघाडीने विरोध केल्याने देशातील कोट्यवधी महिलांच्या न्याय्य हक्कांवर घाला घातला गेला आहे. महिला आरक्षणाला विरोध म्हणजे थेट देशातील नारीशक्तीचा अपमान असून, विरोधकांची महिलांविरोधी व कुटुंबप्रणित राजकारणाची मानसिकता पुन्हा एकदा उघडी पडली आहे. महिलांना सत्तेत सहभागी होऊ द्यायचे नाही, हीच भूमिका आज देशासमोर आली असून, ही बाब मातृपूजक भारतासाठी लाजिरवाणी असल्याची भावना नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातून व्यक्त करण्यात आली.

काँग्रेस आणि विरोधकांच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात ‘महिलांचा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि भाजपा पिंपरी-चिंचवड महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या मोर्चात भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी तसेच सर्वासामान्य महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा – ‘राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ संकल्प सप्ताह’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

या आंदोलनात विद्यमान नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी ठाम भूमिका मांडत महिलांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे आवाज उठवला. त्यांनी सांगितले की, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या शक्तींविरोधात रस्त्यावर उतरून लढा देणे ही काळाची गरज आहे.
मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष व इंडी आघाडीतील त्यांच्या सर्व सहकारी पक्षांचा तीव्र जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत नारीशक्तीचा बुलंद आवाज एकजुटीने मांडला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महिला आरक्षणाला विरोध करणारे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी विरोधी पक्ष हे केवळ राजकीय पक्ष नाहीत, तर भारतातील तमाम नारीशक्तीच्या स्वाभिमानाचे शत्रू आहेत. त्यांचे महिलांना त्यांच्या न्याय, हक्कापासून तसेच सत्तेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व रणमर्दानी महिला भगिनी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाचे आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी काम करत असून शहरातील नारीशक्ती आता शांत बसणार नाही, आमचा हक्क मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!”
– प्रा. सोनाली गव्हाणे, विद्यमान नगरसेविका, पिं. चिं. मनपा.





