पिंपळे निलख परिसरातील हॉटेलमध्ये अवैध व्यवसायाचा संशय
तुषार कामठे यांचे पोलीस प्रशासनाला पत्र; नागरिकांची कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
विशाल नगर, जगताप डेअरी परिसरातील साई इन आणि ओयो हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचा संशय व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर याबाबत लेखी पत्राद्वारे पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.
तुषार कामठे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या परिसरात रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र असलेल्या या परिसरात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांमुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.संबंधित हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : भाजपाच्या रडारवर अजित पवारांची राष्ट्रवादी; रोहित पवारांचा इशारा

“या भागात काही दिवसांपासून बाहेरील व्यक्तींची ये-जा वाढली आहे. हॉटेलच्या नावाखाली वेगळाच व्यवसाय सुरू असल्याचा संशय आम्हाला आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी,” अशी मागणी कामठे यांनी केली आहे.




