सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४७ वा वार्षिक कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा
प्रा. बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांचा “सिंधुदुर्ग भूषण” पुरस्काराने सन्मान
पिंपरी चिंचवड : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४७ वा वार्षिक कौटुंबिक स्नेहमेळावा स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट रोजी ग. दी. माडगुळकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारोच्या संख्येने सिंधुदुर्गवासियांनी हजेरी लावून हा सोहळा अविस्मरणीय ठरविला.
या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मा. पांडुरंग साळगावकर यांच्या हस्ते तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. अजय संभाजी पाताडे यांच्या उपस्थितीत प्रा. बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांना “सिंधुदुर्ग भूषण” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या स्नेहमेळाव्यादरम्यान भरतनाट्यम, कोळीगीते, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, वेशभूषा स्पर्धा आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळातील सभासदांच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. धनश्री मेंडजोगी व कोमल शिरभाते यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली.
हेही वाचा : जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढून सभासदांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष पराग पालकर तसेच आनंद साटलकर, संजय सावंत, अनिल सावंत, नंदकिशोर सावंत, बाळकृष्ण गुरव, विश्वास राणे, महादेव बागवे, विजय अहिरे, संतोष गावडे, श्री कोरगावकर, विष्णू भुते, विजय महाडिक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये सुशील वारंग (जनरल मॅनेजर, स्किल डेव्हलपमेंट- कमर्शियल व्हेईकल, टाटा मोटर्स), राजू मिसाळ (माजी उपमहापौर), सुजाता पालांडे (नगरसेविका व भाजपा महिला अध्यक्षा), सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, उद्योजक प्रमोद राणे, अरविंद पालव, रमेश बागवे, प्रकाश बापार्डेकर (अध्यक्ष, पांचाळमय ब्रम्ह सुतार), यशवंत कन्हेरे (पी. चि. मनपा स्वच्छता ब्रँड एम्बेसेडर), संदीप साळुंखे (अध्यक्ष, खेड युवा शक्ती फाउंडेशन), राहुल ढेबे, मयुरेश खानोलकर, शिवाजी चौगुले, अभय नरडवेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष साटम, संजय सावंत, भूमिका सावंत आणि क्षितिजा साटलकर यांनी रंगतदार पद्धतीने पार पाडले.
सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा हा ४७ वा वार्षिक स्नेहमेळावा केवळ सांस्कृतिक संमेलन न ठरता, सिंधुदुर्गवासियांना एकत्र आणणारे, कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे असे एक आगळेवेगळे व्यासपीठ ठरले.





