भोसरीत शिवजयंतीचा उत्सव उत्साहात
शिक्षण विश्व: मास्टर माईंड ग्लोबल स्कूलची भव्य रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड : Master Mind Global English School (MMGES) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध उपक्रमांनी शाळा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर सकाळी साडेआठ वाजता शाळेपासून भोसरी चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने ढोल-ताशांच्या तालावर सादर केलेल्या दमदार प्रदर्शनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान शिस्तबद्ध संचलन आणि पारंपरिक वेशभूषेमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी नृत्याविष्कार सादर केले. स्वराज्य स्थापनेचा इतिहास, पराक्रम आणि दूरदृष्टी यांचे प्रभावी चित्रण या सादरीकरणांतून करण्यात आले. “विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास समजावा आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण व देशप्रेमाची भावना विकसित व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चोख बंदोबस्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा जागृत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना…
Master Mind Global English School येथे साजरी करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही केवळ पारंपरिक उत्सवापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा भाग ठरली. रॅली, लेझीम, ढोल-ताशा आणि ऐतिहासिक नृत्याविष्कार यांच्या माध्यमातून इतिहासाचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मदत होते. तसेच, पोलीस प्रशासनाचा सत्कार करून समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला, जो मूल्याधिष्ठित शिक्षणाचा महत्त्वाचा भाग मानला जाऊ शकतो.




