‘मगर विद्यालयात माध्यमिकचे वर्ग सकाळच्या सत्रात नको’; माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये अण्णासाहेब मगर विद्यालयात समस्येचा डोंगर निर्माण झाला आहे. या ठिकाणी दुपारच्या सत्रात सुरू असणारे माध्यमिक विभागाचे वर्ग सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वर्ग खोल्या कमी असल्याने सकाळच्या सत्रात भरणाऱ्या इतर बालवाडी आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घेतलेला निर्णय स्थगित करून माध्यमिक विभागाचे वर्ग दुपारच्याच सत्रात भरविण्याची मागणी, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. तसेच शिक्षकांची संख्या देखील वाढविण्याची मागणी काटे यांनी केली आहे.
माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ मध्ये महापालिकेचे अण्णासाहेब मगर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. बालवाडीचे वर्ग देखील या ठिकाणी भारतात. या तीनही वर्गाची एकूण १ हजार ८५० विद्यार्थी संख्या आहे. या मध्ये बालवाडीची १५०, प्राथमिक ५०० आणि माध्यमिक १ हजार २०० अशी भरीव पटसंख्या आहे. शाळेची विद्यार्थी संख्या मोठी असताना देखील शाळेचे कामकाज तडजोडीने करण्याची वेळ शाळा प्रशासनासमोर आली आहे. अण्णासाहेब मगर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांची संख्या कमी आहे. एकूण शिक्षकापैकी तीन शिक्षकांची कमतरता सध्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे जिकिरीचे होत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा अतिरिक्त भार इतर शिक्षकांवर पडत आहे. या शिक्षकांवर त्याचा ताण येत आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा! ‘वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’चे मंगळवारी लोकार्पण
या बरोबरच विद्यालयात पुरेशा वर्ग खोल्या उपलब्ध नाहीत. पाच वर्गांना बसण्याची जागा उपलब्ध नाही. १ ऑगस्ट २०२३ पासून माध्यमिक शाळेचे वर्ग देखील सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन सत्रात भरवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या बालवाडी आणि प्राथमिक शाळेच्या वर्गांनाच वर्ग खोल्या पुरेशा नाहीत तर सकाळच्या सत्रात माध्यमिक शाळेचे वर्ग कुठे आणि कसे भरवणार ?” असा संतप्त सवाल माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला उपस्थित केला आहे.
ताताडीने शिक्षक भरती करा – शत्रुघ्न काटे
या निर्णयामुळे बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक या तिनही विभागात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तसेच शाळा प्रशासनावर याचा अतिरिक्त भार पडून शाळेच्या कामकाजावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे काटे यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे १ ऑगस्ट २०२३ पासून माध्यमिक शाळेचे वर्ग सकाळच्या सत्रात भरवण्याच्या निर्णयास पूर्णपणे स्थगिती देऊन माध्यमिक शाळेचे वर्ग हे दुपारच्याच सत्रात भरवण्यात यावे. तसेच, प्राथमिक शाळेत कमी पडत असलेल्या शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशी मागणी काटे यांनी केली.





