ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची निवेदनाद्वारे मागणी

नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या धार्मिक यात्रांसाठी आवश्यक खर्च वाढत असताना सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवण्याची मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सविस्तर पत्र पाठवून आळंदी नगरपरिषदेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, आळंदी नगरपरिषदेला सध्या यात्राकराच्या स्वरूपात केवळ १.६२ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, सन २०२३–२४ या कालावधीत यात्रेसाठी नगरपरिषदेला तब्बल २.७३ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. परिणामी, सुमारे १.११ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च नगरपरिषदेच्या स्वतःच्या निधीतून करावा लागला आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

हेही वाचा        :                पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी

याच आर्थिक तणावामुळे नगरपरिषदेची वीज देयके आणि शासकीय पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. यात्रेच्या व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था उभारावी लागते. मात्र सध्याचे अनुदान या खर्चासाठी अपुरे ठरत असल्याने नगरपरिषदेला वारंवार स्वतःच्या निधीवर ताण येत आहे.

दरम्यान, संतश्रेष्ठ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा होणार असून, या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी श्रीक्षेत्र आळंदी येथे येणार आहेत. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार लांडगे यांनी अधोरेखित केले आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनानेही यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालयाकडे अनुदान वाढीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे कामकाज सुरळीत आणि सक्षमपणे चालण्यासाठी यात्रा अनुदानात वाढ करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

श्रीक्षेत्र आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. त्यामुळे यात्रेच्या काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना आणि सुरक्षेसाठी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. सध्याचे शासकीय अनुदान अपुरे पडत असल्याने ते वाढवणे आवश्यक आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून, आळंदी नगरपरिषदेला सक्षमपणे काम करता यावे आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button