‘पीसीसीओईआर’ची राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत धडक!
शिक्षण विश्व: "टीम तटरक्षक" ने पटकावला प्रथम क्रमांक

पिंपरी- चिंचवड : भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर आणि जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयआयटी कानपूर येथे आयोजित राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या “टीम तटरक्षक” ने प्रथम क्रमांक पटकावला.
देशभरातून ३०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विजेत्या संघात अभिषेक गिरी, वैशाख आनंद एम, माहेक फातन, सृष्टी सावळी यांचा समावेश होता.

विजेत्या संघाला मार्गदर्शन केले पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. समीर सावरकर, आणि आरएनडी प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे यांनी. त्याचबरोबर पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तसेच पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. पीसीसीओईआरच्या टीम तटरक्षकची ही यशस्वी कामगिरी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्याच्या क्षमतेचे प्रतिक आहे.
हेही वाचा – ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“इनोवेशन इन रेझिलियनट इन्फ्रास्ट्रक्चर”…
टीम तटरक्षकने सादर केलेल्या प्रकल्पाचे शीर्षक होते “इनोवेशन इन रेझिलियनट इन्फ्रास्ट्रक्चर”, ज्यामध्ये मजबूत तांत्रिक पायाभूत रचना, नाविन्यपूर्ण डिझाईन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची क्षमता यांचा समावेश होता. या प्रकल्पाचा उद्देश होता ‘किनारपट्टीवरील पूरपरिस्थिती आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणीय बुद्धिमत्ता आणि संरचनात्मक अभियांत्रिकी तत्त्वांचा समन्वय साधून शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करणे’. स्पर्धेत प्रकल्पांचे सखोल तांत्रिक परीक्षण, दस्तऐवजीकरण पडताळणी, व्यवहार्यता विश्लेषण, नूतन उपक्रम मूल्यांकन तसेच व्यावसायिक विस्तारक्षमतेचे परीक्षण अशा कठोर निकषांवर केले गेले.





