साईनाथ नगरमधील बांधकाम नियमित करा
भाजप पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आयुक्त शेखर सिंह व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्वरित कारवाईची मागणी

निगडी (पिंपरी चिंचवड) : साईनाथ नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या कामगार व सामान्य नागरिकांना आता त्यांच्या घरांबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PCNTDA) यांनी १९७२, १९८४ व १९८६ साली संपादित केलेल्या जमीन भूखंडांवर घर बांधून राहणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेच्या नोटिसा मिळाल्याने चिंता वाढली आहे. या संदर्भात भाजप पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आयुक्त शेखर सिंह व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मागणी केली की, साईनाथ नगरमधील बेकायदेशीर ठरवलेले बांधकाम नियमित करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.
शेतीचा भूखंड ते कामगारांचे निवासस्थान
पीसीएनटीडीएने जरी भूमी अधिग्रहित केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मूळ शेतकऱ्यांकडून भूखंडाचा ताबा घेतला गेला नव्हता. परिणामी, संबंधित भूखंडांच्या सातबाऱ्यावर मूळ शेतकऱ्यांची नावे कायम राहिली. याच काळात शहरात स्थलांतरित झालेल्या अनेक कामगारांनी उदरनिर्वाहासाठी आणि हक्काच्या निवासासाठी या भूखंडांची साठेखत करून खरेदी केली.
हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
नागरिकांचे आरोप – “महापालिकेने पूर्वी पैसे घेतले, आता नोटिसा देत आहेत”
या भागात बांधकाम सुरू असताना स्थानिकांनी सांगितले की, महानगरपालिका प्रशासनाने आर्थिक शुल्क आकारून काही प्रमाणात बांधकामांना अप्रत्यक्ष मान्यता दिली होती. मात्र आता, तेच बांधकाम बेकायदेशीर ठरवत नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता व संतापाचे वातावरण आहे.
“विकास प्राधिकरणाने ताबा घेतला नाही, म्हणून व्यवहार झाले”
सचिन काळभोर यांनी स्पष्ट केले की, मूळ शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष ताबा न घेतल्यामुळेच जमीन व्यवहार झाले. प्राधिकरणाने वेळेवर ताबा घेतला असता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. त्यामुळे आता नागरिकांना त्रास न होता, या बांधकामांना नियमित करून त्यांना न्याय द्यावा.
नियमितीकरणासाठी तातडीची कारवाई करा – मागणी
या सगळ्या पार्श्वभूमीवर साईनाथ नगरमधील बांधकाम नियमित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. कारवाईस स्थगिती देत, यथोचित प्रक्रिया राबवून समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षा भाजपतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.