मंजुरीबाई विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन उत्साहात
शिक्षण विश्व: शिक्षिका आणि पालक पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी

पिंपरी-चिंचवड : येथील मंजुरीबाई विद्यालयात वार्षिक पालखी सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडले. शाळेतील परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. पालखीत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.
या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षिका आणि पालक पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थिनींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेतली होती, तर मुलांनी टाळ, वीणा, मृदुंग हातात घेऊन “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
हेही वाचा – ‘मराठी-महाराष्ट्राच्याबाबतीत तडजोड नाही’; राज ठाकरे
शाळेपासून शिवनगरी कॉलनीतील गणेश मंदिर, महादेव नगर पर्यंत दिंडी काढण्यात आली. सोहळ्यानंतर शाळेत फुगडी आणि रिंगण खेळांचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या भजनांवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालखीचे पूजन संस्थेच्या विश्वस्त सौ. कविता भोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीकांत राहणे, माध्यमिक विभागाच्या प्रमुख शीतल माने, बालवाडीच्या वेदिका भोसले तसेच इतर शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक आणि बालवाडी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात हर्षोल्हासाने सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचे जतन आणि संवर्धन केले.