वाकड परिसर भक्तिरसात रंगणार; राम वाकडकर
वाकडमध्ये जया किशोरींचा तीन दिवसीय श्रीकृष्णलीला कथा सोहळा

पिंपरी चिंचवड | वाकड परिसर भक्तिरसात रंगणार आहे. जगप्रसिद्ध आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरी दीदी यांच्या कंठातून साकार होणाऱ्या तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. अंतरीचा कृष्ण जागवू या, कृष्णमय होऊ या” या भावस्पर्शी संदेशासह हा अध्यात्मिक उत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे.
हा सोहळा भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आकार घेत आहे. मुंबई–बंगळूरू महामार्गालगत टीप-टॉप हॉटेलजवळील प्रशस्त जागेत कथा आयोजित केली आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून वाकड, ताथवडे, पुनावळे तसेच आसपासच्या भागातील भाविकांसाठी हा अध्यात्मिक जल्लोष अनुभवण्याची अनोखी संधी आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार का? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले..

जया किशोरी दीदींच्या सुमधुर वाणीतून होणाऱ्या मायरा कथेने देशभरातील लाखो भक्तांच्या हृदयात कृष्णभक्तीचा झरा निर्माण केला आहे. तीन दिवस भक्तिमय अनुभवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी कुटुंबासह उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण वाकड परिसरात या कार्यक्रमाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.





