ट्रॅफिक सिग्नलवर इंग्रजी आकडे बंद, झळकताहेत मराठी अंक
‘मुंबईमध्ये मराठीच चालणार’
मुंबई : मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी हा वाद गेल्या वर्षभरात प्रचंड गाजला. राज्य सरकारच्या नवीन भाषा धोरणाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं केलं होतं. अखेर राज्य सरकारला हिंदी भाषेची सक्ती स्थगित करावी लागली.
असो, पण याच पार्श्वभूमीवर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. आणि हा कोणत्याही भांडणाचा नाही, तर एक सकारात्मक सुरूवात आहे असं म्हणता येईल. ट्रॅफिक सिग्नलवर कालपर्यंत जे आकडे इंग्रजीमध्ये झळकायचे, ते आता मराठीत झळकू लागले आहेत.हेही
वाचा : “हिंदू राहिला नाही तर…”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान चर्चेत
मराठी भाषेला मुंबईत दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना अनेकांच्या मनात होती. त्याला कारणही तसंच इंग्रजीचा वाढता प्रभाव, आर्थिक व्यवहारांमध्ये इंग्रजीची गरज, आणि परप्रांतीयांची वाढती लोकसंख्या. त्यामुळे हिंदीही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. या सगळ्यामुळे मराठी भाषा मागे पडतेय असं अनेकांना वाटू लागलं होतं. पण या भावनेचा आदर ठेवून वाहतूक विभागानं ट्रॅफिक सिग्नलवरील काउंटडाउनचे आकडे मराठीत दर्शवण्याचा निर्णय घेतला. परिणामी मराठी भाषिक लोक हे दृश्य पाहून समाधान व्यक्त करत आहेत.
नेटकरी असं करताहेत कौतुक
हा व्हिडिओ aamchi_mumbai या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ १ लाख ७० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकार आणि वाहतूक विभागाचे आभार मानले आहेत. कोणी “जय महाराष्ट्र” म्हणत कौतुक केलं, तर कोणी आता कम्प्युटरची भाषा देखील मराठी करा असा सल्ला दिला आहे.




