Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टीम इंडियाचं जबरदस्त ‘कमबॅक’! बांगलादेशचा धुव्वा उडवत सेमीफायनलच्या आशा ठेवल्या जिवंत

IND W vs BAN W Women T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत भारतीय महिला क्रिकेट संघाने दणक्यात पुनरागमन केले आहे. मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर गुरुवार, २५ जून रोजी खेळल्या गेलेल्या ग्रुप स्टेजच्या चौथ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर ५ विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. राधा यादव आणि श्री चरणी यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने बांगलादेशला १३६ धावांवर रोखले आणि त्यानंतर सलामीवीर शेफाली वर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर १७ व्या षटकातच विजय मिळवून सेमीफायनलमधील आपले स्थान मजबूत केले.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात यश मिळाले. मात्र, यानंतर भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुन्हा एकदा निराशा केली. तिसऱ्या ते पाचव्या षटकादरम्यान भारतीय खेळाडूंनी बांगलादेशच्या फलंदाजांचे तब्बल ४ झेल सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवातही भारताने हीच चूक केली होती. या जीवदानाचा फायदा घेत बांगलादेशने १३६ धावांपर्यंत मजल मारली. परंतु, संघात पुनरागमन करणाऱ्या राधा यादवने ३ आणि श्री चरणीने २ विकेट्स घेत बांगलादेशच्या धावसंख्येला वेसण घातली. दीप्ति शर्मानेही उत्कृष्ट साथ दिली.

हेही वाचा –  तुम्हाला माहितीये असं कोणतं फळ आहे, जे जगात सर्वात जास्त खाल्लं जातं?

१३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना लवकर बाद झाली, पण शफाली वर्माने मैदानात उतरताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. तिने अवघ्या २९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. ९ व्या षटकात ७६ धावांवर शफाली ५३ धावा करून बाद झाली. यानंतर भारताचा डाव काहीसा घसरला आणि ९८ धावांवर ४ गडी बाद झाले.

यादरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यात धाव घेताना २-३ वेळा मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे रनआऊटची भीती निर्माण झाली होती. सुदैवाने बांगलादेशचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे असल्याने भारताचे नुकसान झाले नाही आणि भारताने १६.५ षटकांतच लक्ष्य गाठून ५ गड्यांनी बाजी मारली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button