पिंपरी-चिंचवडच्या राजनंदिनीचा राज्यस्तरावर ‘‘कांस्य नेम’’
दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरीची संधी

राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांचे मार्गदर्शन
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय रायफल अकादमीमधील राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी नेमबाज कु. राजनंदिनी यादव हिने नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षांखालील वयोगटात राजनंदिनीने महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले असून, तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक: प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

राजनंदिनी सध्या प्रशिक्षक आणि राष्ट्रीय नेमबाज अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव, एकाग्रता आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर तिने अल्पावधीतच आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या यशामुळे अकादमीमध्ये आनंदाचे वातावरण असून, सहकारी खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी राजनंदिनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरही ती महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“राजनंदिनीने अत्यंत शिस्तबद्धपणे आणि सातत्याने सराव करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्यातील नेमबाजीची जाण आणि एकाग्रता प्रभावी आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ती आणखी उत्कृष्ट कामगिरी करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
– अरुण पाडुळे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक.




