Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केला आहे.

मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.

त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा – अखेर बच्चू कडूंचं ७ दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन मागे

दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.

आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button