विद्यार्थ्यांच्या आयडीमधील विघ्नेही ‘अपार’

पिंपरी : विद्यार्थ्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक असलेले अपार आयडी तयार करताना शाळांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थी व पालक यांच्या आधार कार्ड व यू-डायस नोंदणीत झालेल्या चुका अपार कार्ड तयार करताना डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे पालकांच्या परवानगीशिवाय चुका दुरूस्त करत येत नाही. दुसरीकडे शहरातील काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, शहरातील ६३ टक्के शाळांनी अपार कार्डची नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत देशाच्या शैक्षणिक पद्धतीत एकूणच आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अभ्यासक्रमापासून ते कार्यपद्धतीपर्यंत मोठे बदल केले जात आहेत. त्यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजीलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी पोर्टलवरुनच अपार आयडीची नोंदणी होत असून राज्य पातळीवर विद्यार्थ्यांची ओळख असलेला यू-डायस क्रमांक आता ‘अपार’मध्ये रुपांतरित होत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात फक्त ६३ टक्के शाळांनी नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याबाबतच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
अपारसाठी यू-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आई- वडिलांचे नाव, आधार कार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांचे यू-डायस आणि आधार कार्डवरील नावांत बदल दिसून येत आहे. विद्यार्थी हा अठरा वर्षांखालील असेल; तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची असल्याने उशीर होत असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.
अपार आयडीसाठी नोंदणी करण्यासाठी सतत ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बैठका सुरू आहेत. अपारसाठी विद्यार्थ्यांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थी व पालक यांच्या आधार कार्डमध्ये चुका असल्याने अपार नोंदणी होत नाही; तर यु-डायस नोंदणीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी शिबिर आयोजित केले आहे. शहरातील ६३ टक्के शाळांकडून अपार कार्डाची नोंदणी झाली आहे.
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग





