भोसरी, मोशी परिसरात दोन तास वीज खंडित
महापारेषणच्या उपकेंद्रातील वीजयंत्रणेत बिघाड

पिंपरी चिंचवड : महापारेषण कंपनीच्या भोसरी २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजयंत्रणेत बिघाड होऊन ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान भोसरी व मोशी परिसरातील सुमारे ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दीड ते दोन तासांपर्यंत खंडित होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या भोसरी (आरएस-२) अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रांमध्ये ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र वीजयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९ च्या सुमारास या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रिपींग आले व वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ८ उपकेंद्रांसह २२ केव्ही क्षमतेच्या १५ वीजवाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भोसरी, डुडूळगाव, चिखली, घरकुल, मोरेवस्ती, नाशिक हायवे, मोहननगर, जय गणेश साम्राज्य, खडीमशीन, चऱ्होली, अलंकापुरम, चोविसावाडी, एमआयडीसीमध्ये सेक्टर ७, सेक्टर १०, सेक्टर १२, पीएमएवाय घरकुले आदी परिसरातील सुमारे ८० हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला
हेही वाचा – ‘जुन्या नव्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार’; शत्रुघ्न काटे
दरम्यान, महापारेषणकडून तातडीने वीजयंत्रणेतील बिघाड दुरूस्त करण्यात आला. दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर अनुक्रमे रात्री १० व साडे दहाच्या सुमारास सुरू करण्यात आले. त्यानंतर महावितरणकडून रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला