Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवाशी खेळ : आयुक्तांकडून केवळ ‘कारणे दाखवा’ नोटिसीचा ‘फार्स’

नागरिकांकडून व्यक्त होतोय संताप: किवळेतील घटनेत पाच बळी गेले तरी ‘डोळेझाक’

पिंपरी : अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. मात्र, सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवाशी खेळ असलेल्या धोकादायक होर्डिंग प्रकरणात झालेल्या बेजबाबदारपणाबाबत केवळ ‘शो कॉज’ नोटीस म्हणजे कारवाई ‘फार्स’ असून, सामान्य नागरिकांच्या जीवाचे मोल प्रशासनाला खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आकाश चिन्ह व परवाना विभागाचे परवाना निरीक्षक राजेश बांदल, सुभाष मळेकर या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. १७ एप्रिल रोजी किवळे येथे एक अनधिकृत जाहिरात फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर शहरातील अधिकृत आणि अनधिकृत जाहिरात फलकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सर्व अनधिकृत फलकांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

या सर्व्हेत तब्बल ९२ नवीन अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. त्यानंतर या फलकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी अनधिकृत फलक आणि न्यायालयात गेलेल्या ज्या जाहिरात फलकाची स्ट्रक्‍चर स्टॅबिलिटी आलेली नाही, अशांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

परवाना निरीक्षक मळेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रात किवळे चौकामध्ये कृष्णा हॉटेलचे आवारातील जाहिरात फलकावर आणि न्यायालयात गेलेल्या ज्या जाहिरात फलकाची स्ट्रक्‍चर स्टॅबिलिटी आलेली नाही, अशा फलकांवर कारवाई केली नाही. परवाना निरीक्षक बांदल यांच्या कार्यक्षेत्रातील नाशिकफाटा उड्डाणपुलाचे बाजूस डबल डेकर जाहिरात फलक आहे. या फलकावर कारवाई करण्याचे लेखी, तोंडी आदेश देऊनही त्यांनी संबंधित फलकावर कारवाई केली नाही. मळेकर आणि बांदल यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे, आदेशाचे पालन केले नाही. यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत असून ही बाब कार्यालयीन दृष्टया योग्य नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत तुमच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच २४ तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिले आहेत.

दरम्यान, धोकादायक होर्डिंग मालकांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा कोणता अधिकारी गाफिलपणा करणार नाही, अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button