पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची निवडणूक २६ एप्रिलला निश्चित!
सोसायटीधारकांचे लक्ष : बिनविरोध निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची चाचपणी

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ४० लाख पिंपरी-चिंचवडकर आणि सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी कायम आग्रही असलेल्या पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ अर्थात सोसायटी फेडरेशनची निवडणूक येत्या रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी विशेष अधिमंडळ बैठकीत ही महत्त्वपूर्ण निवडणूक पार पडणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुकीसंदर्भात निर्माण झालेल्या अनिश्चिततेदरम्यान ‘महाईन्यूज’ने सातत्याने “निवडणुकीला मुहूर्त कधी?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासन पातळीवर हालचालींना वेग येऊन अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महासंघाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी ११ जागांच्या व्यवस्थापन समितीची निवड या प्रक्रियेतून होणार आहे. वाकड येथील ग्रीन ड्राइव्ह रोडवरील मॅक्झीमा सहकारी गृहरचना संस्थेच्या क्लब हाऊसमध्ये सकाळी १० वाजता विशेष अधिमंडळ बैठकीस सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी विलास नामदेव लिंबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

हेही वाचा : इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया: महाविद्यालयांसाठी नोंदणी शिबिर
एका दिवसात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया..
निवडणूक निर्णय अधिकारी विलास लिंबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एका दिवसात टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. दि.२६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत अंतिम मतदार यादीतील सभासदांकडून नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर ११ ते ११.३० या वेळेत अर्जांची छाननी केली जाईल. छाननीनंतर पात्र उमेदवारांची नावे ११.३० ते १२ या वेळेत जाहीर करण्यात येतील. त्यानंतर १२ ते १२.३० या वेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर १२.३० ते १ या वेळेत अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर दुपारी १.३० ते ३ या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, असेही विलास लिंबळे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लांबणीवर का पडली होती?
महासंघाची निवडणूक काही प्रशासकीय आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे लांबणीवर पडली होती. यामुळे महासंघाचे दैनंदिन कामकाज आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याची चर्चा सभासदांमध्ये होती. अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर परिणाम होत असल्याने सभासदांमध्ये असंतोषही वाढत होता. याच पार्श्वभूमीवर ‘महाईन्यूज’ने या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत “निवडणुकीला मुहूर्त कधी?” असा थेट सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर अखेर निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
निवडणूक बिनविरोध?
निवडणूक निर्णय अधिकारी विलास लिंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व वेळबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे. आवश्यकतेनुसार निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार त्यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. पाच वर्षांसाठी महासंघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? याबाबत विविध गटांमध्ये चर्चा सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी पॅनल बांधणीचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होईल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक जाहीर झाल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता २६ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे शहरातील सोसायटीधारकांचे लक्ष लागले आहे.





