इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया: महाविद्यालयांसाठी नोंदणी शिबिर
शिक्षण विश्व: नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा

पिंपरी-चिंचवड | मा. मुख्यमंत्री यांच्या ईज ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी नुकतेच एक विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे हे शिबिर पार पडले. या प्रसंगी सहाय्यक संचालक सौ. ज्योती परिहार मॅडम यांनी उपस्थित महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांना सौ. फणसे मॅडम यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता…
पिंपरी-चिंचवडमधील सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालयांनी जर ऑनलाईन पोर्टलवर आपली नोंदणी तसेच मूळ कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न केल्यास,प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास तसेच संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागातर्फे देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि पालकांसह विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.





