पिंपळे गुरवच्या माऊली जगताप आणि सहकाऱ्यांनी सात दिवसांत फत्ते केला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक!

पिंपरी-चिंचवड | गिर्यारोहणाची प्रचंड आवड असलेले पिंपळे गुरव येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच जगातील सर्वोच्च शिखर, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी ट्रेकिंग करून पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माऊली जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर नियमितपणे ट्रेकिंग करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी यशस्वी चढाई केली आहे. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पसारख्या खडतर ट्रेकला गवसणी घातली आहे.
नेपाळमधील खुंबू हिमनदीजवळ ५ हजार ६०० मीटर उंचीवर असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प हा जगातील गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. या बेस कॅम्पपर्यंत पोहोचणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. साधारणपणे हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. येथील हवामान अत्यंत थंड असून तापमान उणे १३ अंश सेल्सियसपर्यंत खाली येते. उंची वाढत जाते तसतसे हवामानाशी जुळवून घेणे हे या ट्रेकमधील सर्वात महत्त्वाचे आव्हान असते.
हेही वाचा : ‘मराठीसाठी किरकोळ भांडण बाजूल ठेवतो, चला सोबत येऊ’; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देणार?
माऊली जगताप यांच्यासोबत पराग निखाडे, राजेंद्र प्रजापती, कांचन इंगळे, सुलभा शेरताटे, निनाद निखाडे, छाया निखाडे, सतिश शिंदे, अजित मिसाळ, सुमती देसाई, विकास सोनवणे आणि राकेश तापकीर या त्यांच्या सहकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी या रोमांचक ट्रेकिंगला सुरुवात केली. या सर्वांनी आपल्या एकत्रित प्रयत्नांनी आणि दृढ निश्चयाने अवघ्या सात दिवसांत, म्हणजेच १२ एप्रिल रोजी हा कठीण ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी माऊली जगताप आणि त्यांच्या टीमने गेल्या वर्षभरापासून कठोर परिश्रम घेतले होते. त्यांनी नियमितपणे छोटे-मोठे ट्रेक केले आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सायकलिंगसारखे व्यायाम प्रकार केले. त्यांच्या याच अथक प्रयत्नांमुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक कणखरता लाभली, ज्यामुळे हा अवघड ट्रेक यशस्वी करणे शक्य झाले. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल माऊली जगताप आणि त्यांच्या टीमचे आमदार शंकर जगताप यांच्यासह पिंपळे गुरवमधील ग्रामस्थ आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.
माऊली जगताप यांनी व्यक्त केल्या भावना
“एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे, आमचे मार्गदर्शक आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, ५ एप्रिलला आम्ही या ट्रेकला सुरुवात केली आणि सात दिवसांत, १२ तारखेला तो यशस्वीरित्या पूर्ण केला. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि भविष्यात आणखी उंच शिखरे सर करण्याचा माझा प्रयत्न असेल.”