PCMC: 30 मिनिटांच्या पावसाने हिंजवडी परिसर झाला ‘वॉटर पार्क’
अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहराची दैना! : जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप

पिंपरी चिंचवड: विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार हजेरी लावली. शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा परिसर अक्षरशः ‘वॉटर पार्क’ झाला. अवघा अर्धा तास आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. हिंजवडीप्रमाणे शहरातील भोसरी, कासारवाडी, रावेत, पिंपळे निलख यांसारख्या भागामध्ये ही पाणी साठलेले पाहायला मिळाले.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नालेसफाई, आपत्कालीन व्यवस्थापन, बैठका, प्रशासकीय आदेश या सर्व गोष्टी फोल ठरल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी प्रमाणेच शहरातील विविध परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे. टेल्को रोड, लांडेवाडी, हिंजवडी या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
भोसरी परिसरातील शांतीनगर, गाव जत्रा मैदाना लगतचा रस्ता लांडेवाडी आणि भोसरी एमआयडीसी हद्दीत देखील काही मिनीटांच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी दहा वाजता अवघ्या 30 मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल झाल्याचे समोर आले. दोन्ही ठिकाणी नालेसफाई न झाल्याने ही अवस्था निर्माण झाली असल्याचे दिसून आले. पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि कागदी घोडे नाचवणे एवढेच प्रकार सुरू असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावरती संताप व्यक्त केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट
हिंजवडी फेज २ परिसरामध्ये काही मिनीटामध्ये पावसामुळे जागोजागी पाणी साचले. प्रशासनाच्या या कारभारावरची खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, त्यांनी सोशल मिडियावर पावसाचे, पाणी साचल्याचे व्हिडीओ टाकत पोस्ट लिहली आहे. “हिंजवडी फेज २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. महापालिका प्रशासन,एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून येथे भविष्यात पाणी साठून नागरीकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.” असे या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हिंजवडी त प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा
मान्सूनच्या सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजनाचा पुरता फज्जा पावसाने उडवला. जागोजागी पाणी साठलेले पाहायला मिळाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. मुख्यत्वे भोसरी, कासारवाडी, हिंजवडी, रावेत यांसारख्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक दुचाकी गाड्या जागोजागी बंद पडलेल्या दिसून आल्या. मनस्ताप झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.