Healthcare Facilities : मावळात पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटल-रिसर्च सेंटर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार लोकार्पण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार

मावळ, आंबी । प्रतिनिधी : मावळ-आंबी परिसरातील नागरिकांसाठी एक नवा आरोग्यदायी टप्पा ठरावा, अशा उद्देशाने पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या अत्याधुनिक, बहुविशिष्ट चॅरिटेबल रुग्णालयाचे भव्य उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. डी. वाय. पाटील यांच्या “गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा संपूर्ण भारतभर पोहोचवण्याच्या” दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. उद्या, रविवार, दि. 8 जून रोजी दुपारी 12.30 वाजता उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेन्ट आणि चान्सलर डॉ. विजय पाटील, व्हॉईस प्रेसिडेन्ट आणि प्रो-चान्सलर शिवानी पाटील उपस्थित राहणार आहेत.
रुग्णालयात एआय समर्थित 1.5 टेस्ला एमआरआय, 256 स्लाइस सीटी स्कॅन, कार्डियक कॅथ लॅब, फ्लोरोस्कोपी, एंडोस्कोपी, मॅमोग्राफी, 2D इको, ट्रेडमिल टेस्ट व रंगीत डॉप्लरसह अल्ट्रासाऊंडसारखी अचूक निदान यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय, प्रगत पॅथॉलॉजी लॅब, रक्तबँक आणि संपूर्ण औषध वितरण व्यवस्था रुग्णसेवेसाठी तत्पर आहे.
या रुग्णालयात सर्वसामान्य वैद्यकीय विभागांसह त्वचारोग, व्रणरोग, कुष्ठरोग, मानसोपचार, बालरोग, हाडरोग, ईएनटी, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूती, युरोलॉजी, कॉस्मेटोलॉजी, दंतचिकित्सा आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा विविध उपचार शाखा कार्यरत आहेत. तसेच, शासकीय योजना व टीपीए सुविधा लागू करण्यासाठीही कार्यवाही सुरू आहे.
650 बेडचे अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णालय…
650 बेडचे हे तृतीयक काळजी केंद्र रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सुविधा पुरवते. यामध्ये 60 खाटांचे इंटेन्सिव्ह केअर युनिट (मेडिकल, सर्जिकल, पीडियाट्रिक, कार्डिएक, रेस्पिरेटरी), 24 तास कार्यरत 30 बेडचा आपत्कालीन विभाग, 13 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि नवजात बालकांसाठी स्वतंत्र आयसीयू आदी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
डी.वाय. पाटील हॉस्पिटल मावळवासीयांसाठी नवे आरोग्य पर्व…
ऑक्सिजनच्या अखंड पुरवठ्यासाठी स्वतःचा पीएसए ऑक्सिजन प्लांट आणि लिक्विड ऑक्सिजन टाकी कार्यरत असून, जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा, तसेच सोयीस्कर स्थानामुळे या रुग्णालयाचे स्थानिक आरोग्यसेवेत मोठे योगदान राहणार आहे. पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटलची अनुभवी वैद्यकीय टीम, तंत्रज्ञ व सहानुभूतीपूर्वक सेवा देणारे कर्मचारी हे रुग्णकेंद्रित दृष्टिकोनातून कार्यरत असून, आंबी तसेच परिसरातील नागरिकांसाठी एक नवे आरोग्यदायी पर्व सुरु होणार आहे.