Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

ऑलिंपिकपटू ‘‘सुवर्णकन्या’’ हिमानी चोंधे हिला आर्थिक मदतीची गरज!

दानशुरांनी मदत करण्याचे आवाहन : २४ सुवर्णपदकांची मानकरी पण आर्थिक संकटात!

पुणे : आगामी ऑलिंपिक व विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात सुवर्णपदकावर नाव कोरून देशाचे आणि मुळशी तालुक्याचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न उरी बाळगून प्रचंड मेहनत घेणारी सुवर्णकन्या हिमानी चोंधेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

भुगावची कन्या हिमानी ही १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारातील राष्ट्रीय नेमबाजपटू आहे. सध्या ती भोपाळ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे. शालेय वयापासून नेमबाजीमध्ये अव्वल स्थान तिने प्राप्त करत आंतरशाला, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर ती यश मिळवत गेली.

अर्जुन पुरस्कारार्थी नेमबाजपटू अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हिमानी सराव करत आहे. विविध स्पर्धात भाग घेत आतापर्यंत तिने २४ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. २०२३ मध्ये तिने राष्ट्रीय पातळीवर अव्वल गुणानुक्रमांक मिळवून देदीप्यमान कारकीर्दीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. २०१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर व अन्य स्पर्धातही सुवर्णपदके पटकावली आहेत.

दोनवेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. खडतर प्रवास करून ती इथवर पोहचली आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत १० मीटर इनडोअर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदकासह जगात अव्वल नेमबाज होण्याचं तिचं स्वप्न आहे.

मात्र, प्रचंड गुणवत्ता आणि प्रतिभा असूनही घरची नाजूक परिस्थिती तिच्या खेळाच्या आड येत आहे. तिच्या पंखात ताकद येण्यासाठी तिला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत ती खेळाला सामोरी जात आहे.याबाबत तिचे वडिल सूर्यकांत चोंधे यांनीही आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

… असा आहे खर्च

हिमानीला नेमबाजीच्या सरावासाठी आधुनिक साहित्याची गरज आहे. दिवसाला किमान ४ हजार रुपयांचे पॅलेट्स (गोळ्या) लागतात. शिवाय आधुनिक रायफलची आवश्यकता आहे. तिची किंमत सुमारे ४ लाख आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांसाठी अतिशय खर्चिक असलेला सराव तिला झेपत नाही. हिमानी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असून, वडील सूर्यकांत हे भूगाव येथे झेरॉक्स दुकान चालवतात. त्यांचाही नुकताच मोठा अपघात झाला होता, त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. दवाखाना अन दुसरीकडे हिमानीचा खर्चिक सराव म्हणजे त्यांच्यापुढे मोठा डोंगर बनून उभा आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button