इरफान सय्यद यांना कोणीही ओळखत नव्हते : ॲड. सचिन भोसले
पिंपरी : कामगार नेते इरफान सय्यद यांना कोणीही ओळखत नव्हते. त्यांना शिवसेनेने ओळख दिली. त्यांच्या बाहेर पडण्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी टीका ठाकरे गट शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कामगार नेते इरफान सय्यद यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यांना उपनेतेपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना ॲड. भोसले यांनी टीका केली आहे.
ॲड. सचिन भोसले म्हणाले की, इरफान सय्यद यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांना शिवसेनेने भरपूर दिले. काही कमी पडू दिले नाही. शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हते. सेनेने पदे देवून त्यांना मोठे केले. आजच्या घडीला त्यांच्यासोबत कोणीही पदाधिकारी गेलेला नाही. त्यांच्या सोडून जाण्याने काहीही फरक पडणार नाही.





