निगडीतील रस्ते खोदकामामुळे वारकऱ्यांना, नागरिकांना त्रास
पालखी सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थित करावे - सचिन काळभोर

पिंपरी चिंचवड : सालाबादप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिनांक १९ जून २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी येथे दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखीचा पारंपरिक मुक्काम आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे राहणार आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांमुळे वारकरी बांधवांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित ठिकाणी स्वतः पाहणी करून निर्णय न घेता थेट ठेकेदारांना दिलेल्या कामांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्ते आणि वाहतूक व्यवस्था योग्य करावी, अशी मागणी सचिन काळभोर, शहर चिटणीस, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.
सध्या संभाजी चौक ते निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच ट्रॅव्हल्स बस आणि मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वावर वाढल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
हेही वाचा – ‘मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो’; संजय शिरसाट
वारकरी सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी खालील मागण्या पुढे आल्या आहेत:
पालखी मार्गावरील सर्व मोठ्या वाहनांना (मालवाहू ट्रक, ट्रॅव्हल्स) तात्काळ बंदी घालण्यात यावी. उप रस्ते बॅरिकेट लावून खाजगी वाहनांचीही आवाजवी वाहतूक रोखण्यात यावी.
वाहतूक पोलीस अधिकारी आणि ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात यावी. भेळ चौक आणि संभाजी चौक सिग्नलवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक नेमावे.
या रस्त्यांचे जुन्या दर्जाचे ऑडिट न करता थेट ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम दिले गेल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी आहे. विशेष म्हणजे, निगडी प्राधिकरणातील रस्ते आधीपासून चांगल्या स्थितीत होते, तरीही नव्याने खोदून मोठ्या खर्चात रस्ते बांधले जात आहेत.