महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी.! ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

weather update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागाला झोडपून काढले. अनेक भागात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात असलेल्या बागेतील टाकी सुद्धा वाहून गेली असून अनेक खेळणी तुटल्या आहेत. शहरातील काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास पाऊस आल्याने ऑफिसमधून घरी जाणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी भर पावसात आपले कर्तव्य पार पाडले व वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोकुळ शिरगाव येथील ओढ्यावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. या ओढ्याचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल गेल्याने तो ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना घडत असताना येथील स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हातातून दोरी निसटल्याने तो पुन्हा पाण्यात वाहू लागला.
हेही वाचा – पुण्यात पुन्हा अपघात; कात्रजमध्ये भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, चालकाला अटक
पुढे एका झाडाला त्याने पकडले तेव्हा स्थानिकांनी कसरत करत वाहून जाण्यापासून वाचवले आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर शहराजवळ सरनोबतवाडी भागात एक शाळकरी मुलगा सायकलवरून जात असताना पावसाच्या पाण्यात सायकल घातल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. बचाव पथक मुलाचा शोध घेत आहेत.
हवामान विभागाने आज पावसाचे अलर्ट जारी केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.