Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’ : आमदार अमित गोरखे

शिक्षण विश्व: फर्ग्युसन कॉलेजमध्ये भावी आर्किटेक्ट्सना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | वास्तुकला म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि स्टीलची रचना नसून, ती मानवी वर्तन, भावना आणि विचारांवर खोल परिणाम करणारी कला आहे. आजच्या तरुण पिढीने जागतिक डिझाइन्सची आंधळी नक्कल न करता भारतीय संस्कृती, हवामान आणि मानवी संवेदनशीलतेचा विचार करून भविष्यातील भारताचा पाया रचावा. डिझाइन केवळ इन्स्टाग्रामवर झळकण्यासाठी नव्हे, तर इतिहासात नोंदवले जाईल अशा दर्जाचे असावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित ‘Elevation 2026’ या उपक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गासह मोठ्या संख्येने भावी आर्किटेक्ट्स व इंटीरियर डिझायनर्स उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार गोरखे म्हणाले की, देशाची प्रगती केवळ जीडीपीसारख्या आकड्यांतून मोजता येत नाही, ती प्रत्यक्ष अनुभवातून दिसून येते. देशाची ओळख त्याच्या वास्तूंमधून होते. ताजमहाल, संसद भवन किंवा अजिंठा-वेरूळच्या लेण्या आजही आपल्याशी संवाद साधतात. आपल्या पूर्वजांनी वास्तुकलेला केवळ व्यवसाय न मानता ‘धर्मा’प्रमाणे पवित्र मानले. त्यांनी निसर्गाशी संघर्ष न करता निसर्गाशी संवाद साधला; हेच तत्वज्ञान आजच्या वास्तुविशारदांनी आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

शॉर्ट-कट आर्किटेक्चरवर टीका

सध्याच्या काळात बजेट आणि वेळेच्या मर्यादांमुळे वाढणारे ‘शॉर्ट-कट आर्किटेक्चर’ भविष्यात गंभीर समस्या निर्माण करू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ ‘स्मार्ट सिटीज’ नव्हे, तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या ‘सेन्सेटिव्ह सिटीज’ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बी. व्ही. दोशी आणि चार्ल्स कोरिया यांनी घालून दिलेल्या आदर्शांप्रमाणे गरिबांनाही वास्तूतून प्रतिष्ठा मिळायला हवी, असे ते म्हणाले.

हेही वाचा     :            मोशी–चिखली परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी

इंटीरियर डिझाइन म्हणजे वास्तूचा आत्मा

इंटीरियर डिझाइनच्या महत्त्वावर भाष्य करताना आमदार गोरखे म्हणाले की, आर्किटेक्ट इमारतीचे शरीर उभे करतो, तर इंटीरियर डिझायनर त्यात आत्मा फुंकतो. प्रकाश, ध्वनी, स्पर्श आणि रंग यांचे संतुलन म्हणजे खरे डिझाइन होय. एक शाळा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करू शकते, तर एक रुग्णालय रुग्णाला आशा देऊ शकते; ही ताकद डिझाइनमध्ये असते. विदेशी मासिकांची नक्कल करण्यापेक्षा भारतीय जीवनशैलीचा आदर करणारी डिझाइन्स निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘विकसित भारताचा पाया तुमच्या हातात’

२०४७ चा विकसित भारत केवळ भाषणांतून साकार होणार नाही, तर तो भक्कम पायावर उभा राहील. त्या पायाभरणीची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. तुम्ही केवळ इमारती उभारणार नाही, तर भारताची समृद्ध संस्कृती घडवणार आहात, अशा शब्दांत आमदार गोरखे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

भारताचा उद्याचा चेहरा ठरवणारी ही पिढी आहे. तुमच्या कल्पना, संवेदनशीलता आणि मूल्याधिष्ठित डिझाइनमधूनच विकसित, मानवी आणि संस्कृतीप्रधान भारत साकार होणार आहे.

– अमित गोरखे, आमदार, विधान परिषद.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button