पिंपरी-चिंचवड महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी तात्काळ सुरू करा!
महापौरांना निवेदन: भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी मागील काही कालावधीपासून बंद असल्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. हा निधी तात्काळ सुरू करून त्यामध्ये वाढ करण्यात यावी, अशी ठाम मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी केली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने महापौर रवी लांडगे यांना (दि. १०) लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना दिनेश यादव यांनी सांगितले की, “महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी बंद असल्यामुळे अनेक गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना आवश्यक उपचारांसाठी आर्थिक मदत मिळत नाही. आजच्या महागड्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निधी सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे.”
हेही वाचा : ‘डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’ : आमदार अमित गोरखे
ते पुढे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी तात्काळ सुरू करावा. तसेच सध्याच्या परिस्थितीनुसार निधीची रक्कम वाढवून अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळेल, याची व्यवस्था करावी.”
महापौरांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सहाय्य मिळू शकेल, अशी अपेक्षा दिनेश यादव यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी बंद असल्यामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. आजच्या महागड्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निधी तात्काळ सुरू करून त्यामध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महापौरांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
– दिनेश यादव, शहराध्यक्ष, युवा मोर्चा, भाजपा.




