कच्च्या तेलाचे दर घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol Diesel Rates | जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचा प्रति बॅरल भाव 64 डॉलर्सपर्यंत खाली आला आहे. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी पातळी मानली जात आहे.
जून महिन्यात हा दर तब्बल 77 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. मात्र जागतिक युद्धस्थिती, अमेरिकेतील ट्रम्प टॅरिफ आणि शटडाऊन यांसारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.
हेही वाचा : कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात
यामुळे देशातील खाजगी रिफायनरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची आयात वाढवून प्रतिदिन 9 लाख 70 हजार बॅरलपर्यंत नेली. यापैकी 60% पेक्षा जास्त तेल कंपन्यांनी रशियाकडून खरेदी केले आहे. स्वस्त दरात कच्चे तेल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून पेट्रोलियम उत्पादने तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यावर कंपन्यांचा भर आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यावर त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचेल का, हा प्रश्न कायम असतो. आता दर 64 डॉलर्सपर्यंत खाली आल्यामुळे सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामान्य नागरिकांना दरकपातीचा दिलासा मिळण्याची मोठी अपेक्षा आहे.





