Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी समन्वय ठेवा’; अण्णा बनसोडे

पिंपरी चिंचवडमधील आपत्कालीन व्यवस्थापनाचा घेतला आढावा

पिंपरी चिंचवड  : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

आगामी मान्सूनच्या पार्शभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा विधानसभा अण्णा बनसोडे यांनी आज घेतला . महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस महापालिका, पोलीस, पाटबंधारे, महावितरण, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम अशा विविध आस्थापनांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. डी. आव्हाड, उप आयुक्त बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार जयराज देशमुख, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, मनोज शेठीया, विजयकुमार काळे, अजय सूर्यवंशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मनोज लोणकर, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, अमित पंडित, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, शीतल वाकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, जलसंपदा विभागाचे अनिकेत हसबनीस, किशोर चव्हाण, माणिक शिंदे, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल, माजी नगरसेविका स्वाती काटे आदी उपस्थित होते.

लोकहितासाठी शासन काम करीत असते. त्यादृष्टिने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपली भूमिका जबाबदारीने बजवावी. सध्या बेमोसमी पाऊस सुरू आहे. शिवाय लवकरच पावसाळा सुरू होत आहे. वारंवार पूराने बाधित होणाऱ्या ठिकाणांसह मोठ्या प्रमाणावर पाणी साचणाऱ्या भागांचा सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रीतपणे पाहणी करून त्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन उपाययोजना तात्काळ केल्या पाहिजेत. तसेच वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आराखडा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत असता कामा नये. नदीच्या काठ परिसरातील रहिवासी भागात पुराचा धोका संभवतो. तर काही ठिकाणी नाल्यांमधील पाणी देखील नागरिकांच्या घरात शिरते. अशावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून तात्काळ तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रशासकीय आस्थापनांनी समन्वयाने काम करावे. आवश्यक त्याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा. आवश्यकतेनुसार त्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करावी. शिवाय त्याठिकाणी वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भोजन, वैद्यकीय सुविधेसह सर्व प्राथमिक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.

नागरिकांना विश्वासात घेऊन आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा तैनात ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. पिंपरीतील लालटोपी नगर, एमआयडीसी, दापोडी, संजय गांधी नगर, कासारवाडी अशा भागातील नागरिकांना पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याभागात प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड शहरात मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. रस्त्यावर चिखल साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे रस्ते तात्काळ स्वच्छ करावेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळित राहिल याची काळजी घ्यावी. झाडपडीच्या घटनांना तात्काळ प्रतिसाद देऊन तेथे पथके पाठवा. नदीकाठी संरक्षक सीमा भिंत उभारण्याच्या दृष्टिनेही विचार करावा. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा नागरी सुरक्षेच्या दृष्टिने महत्त्वाची असून त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा –  IPL 2025 च्या फायनल सामन्यावरुन नवा वाद! बीसीसीआयवर टीकेची झोड, काय आहे प्रकरण?

शासनाची मदत पूर बाधित नागरिकांना तात्काळ मिळावी, यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. बाधित क्षेत्राचा वेळेत पंचनामा करून बाधितांना शासनाची मदत वेळेत मिळेल, याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले. महापालिकेने पावसाळ्यातील आपत्कालीन यंत्रणा हाताळण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याचे संगणकीय सादरीकरण यावेळी मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी केले.

महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

पावसाळ्यात उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील पूर क्षेत्राचा महापालिकेने आराखडा तयार केला आहे. याठिकाणी महापालिकेचे पथक तैनात करण्यात आले आहे. नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची तसेच पाणी पातळीची सूचना त्याभागातील रहिवाशांना देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरामध्ये नालेसफाईचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या भागामध्ये पुराचे पाणी शिरण्याचा धोका आहे, तेथील नागरिकांचे स्थलांतर कुठे करायचे, याचे नियोजन करण्यात आले आहे. तेथे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कुठे संपर्क करावा, याचे क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. तसेच २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे, असे सिंह यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज

शहरातील आपत्कालीन परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणांनुसार पोलीस प्रशासनाने नियोजन केले असून नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जात आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त एम.डी.आव्हाड यांनी यावेळी सांगितले. महापालिका प्रशासनासोबत समन्वय ठेवून पोलीस प्रशासन उपाययोजना करीत आहे. पावसामध्ये वाहतूक कोंडी कुठे होऊ शकते, अशा ठिकाणांची पाहणी करून तेथे उपाययोजना करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि महापालिकेचा नियंत्रण कक्ष एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत. संपर्क यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, असे उप आयुक्त बापू बांगर यावेळी म्हणाले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी देखील जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली.

पुराने बाधित होणाऱ्या परिसराला दिली भेट

यानंतर उपाध्यक्ष बनसोडे यांनी पुराने दरवर्षी बाधित होणाऱ्या पिंपरी येथील संजय गांधी नगर तसेच रिव्हर रोड परिसराला भेट दिली. तसेच याभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीवेळी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह उप आयुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे आदी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button