IPL 2025 च्या फायनल सामन्यावरुन नवा वाद! बीसीसीआयवर टीकेची झोड, काय आहे प्रकरण?

IPL 2025 Final Venue : आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले असून कोण कोणाविरुद्ध खेळणार, हे लवकरच कळेल. मैदानावर कडवी स्पर्धा सुरू असताना, मैदानाबाहेरही वाद सुरू आहेत. कोलकात्यातील अंतिम सामना दुसरीकडे हलवल्याने पश्चिम बंगाल सरकारने बीसीसीआयवर आणि भाजपवर टीका तीव्र केली आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना सुरुवातीला २५ मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणार होता. पण भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयने स्पर्धा थांबवली. नंतर स्पर्धा पुन्हा सुरू करताना वेळापत्रक बदलले गेले. नव्या वेळापत्रकानुसार, दोन प्लेऑफ सामने मुल्लानपूरमध्ये आणि अंतिम सामन्यासह दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत.
बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बंगाल सरकार संतप्त आहे. कोलकात्यातील क्रिकेट चाहत्यांनीही याविरोधात रॅली काढली. बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी पत्रकार परिषदेत बीसीसीआय आणि भाजपवर राजकारणा केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, बीसीसीआयने कोलकात्यातील चाहत्यांची आयपीएलचा अंतिम सामना पाहण्याची संधी जाणूनबुजून हिरावून घेतली.
हेही वाचा – ‘काँग्रेसने कुरघोडी केल्यास आम्हीही करू’; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
कोलकात्यात मान्सूनच्या पावसाचा अंदाज असल्याने बीसीसीआय आणि आयपीएल अधिकाऱ्यांनी प्लेऑफ सामन्याचे ठिकाण बदलण्याचा विचार केला होता, असे मानले जात होते. पण क्रीडामंत्री बिस्वास यांना हे कारण पटले नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, बीसीसीआय आता हवामान तज्ञ झाला आहे का? ते म्हणाले, “१ ते ४ जूनच्या हवामानाचा अचूक अंदाज २६ मे नंतरच कळेल. त्यामुळे आता हवामानाचा कोणताही इशारा नाही. मग बोर्ड कसे हवामानाचा अंदाज लावून निर्णय घेऊ शकते?”
कोलकाता पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनीही कायदा-सुव्यवस्था किंवा सुरक्षेच्या कारणास्तव ठिकाण बदलण्याचा दावा खोडून काढला. त्यांनी सांगितले की, या हंगामात कोलकात्यात ९ पैकी ७ सामने कोणत्याही अडचणीशिवाय पार पडले. चाहते किंवा आयोजकांकडून कोणतीही तक्रार आली नाही. बीसीसीआयनेही कायदा-सुव्यवस्थेच्या चिंतेचा उल्लेख केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.