‘KPMG’ सल्लागार कंपनीला महापालिका अजून किती दिवस पोसणार?

‘केपीएमजी’ सल्लागार कंपनीच्या केंद्र व राज्याच्या विविध योजनाच्या कामकाजाचे मूल्यमापन कधी होणार?
पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र व राज्य शासनाकडील विविध योजनांच्या अमंलबजावणी आणि समन्वय म्हणून केपीएमजी या सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. मात्र, मागील दोन-तीन वर्षात या सल्लागार कंपनीच्या कामकाजाचे मूल्यमापन अद्याप झालेले नाही. कित्येक वर्षापासून सदरील संस्थेला पोसण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. आता पुन्हा त्याच सल्लागार संस्थेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुर्ननिर्माण अभियान, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध पुरस्कृत योजनांची अमंलबजावणी, पाठपुरावा आणि समन्वय ठेवण्यासाठी या सल्लागार संस्थेचे नेमणूक करण्यात आलेली होती. मे. केपीएमजी अॅडव्हायझर सर्विसेस प्रा.लि. या संस्थेला 23 जून 2020 पासून पुढील तीन महिने कालावधीसाठी अथवा निविदा प्रक्रिया पुर्ण होवून नव्याने नेमणूक होणा-या संस्थेस कामकाज आदेश देईपर्यत मुदतवाढ देणे, करारनामा अटी व शर्टीनूसार दोन साईट स्टाफ करिता दरमहा पाच लाख 166 रुपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. स्मार्ट सिटी योजनेतअंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंट प्रकल्पाचे काम दिलेल्या केपीएमजी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भ्रष्टाचाराबाबत खुद्द केंद्र सरकारमधील एका सनदी अधिकाऱ्यानेच (आयएएस) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तरीही महापालिकेने या कंपनीला तब्बल १८ कोटींचे काम दिले आहे. तसेच शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे आणि मोशीतील कचरा डेपोपर्यंत वाहतुकीच्या कामासाठी सल्लागार म्हणून याच कंपनीला नेमण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पारदर्शक कारभारात खळबळ उडाली आहे.





