कल्पतरू हार्मनी सीएचएसने उभारला पीसीएमसीतील सर्वात मोठा २०० किलोवॅट सौर प्रकल्प

पिंपरी-चिंचवड : पर्यावरणीय शाश्वतता आणि ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत, कल्पतरू हार्मनी सहकारी गृहनिर्माण संस्थेने (सीएचएस) आपल्या २०० किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात केले. ४७९ फ्लॅट्स आणि १४०० हून अधिक रहिवासी असलेल्या या प्रतिष्ठित सोसायटीने सोलर स्क्वेअर एनर्जी प्रा. लि. यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे उभारला.
उद्घाटन समारंभाला आमदार शंकर जगताप आणि माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रकल्पात ३७१ उच्च-कार्यक्षमतेचे हाफ-कट बायफेशियल सौर पॅनेल्स (प्रत्येकी ५४० डब्ल्यूपी) बसवण्यात आले असून, यामुळे सोसायटीला दरवर्षी अंदाजे ४८ लाख रुपयांची वीज बचत आणि ४३५ मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात कपात होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये:
स्थापित क्षमता: २०० किलोवॅट
सौर पॅनेल्स: ३७१ (प्रीमियर मेक, ५४० डब्ल्यूपी, हाफ-कट बायफेशियल)
प्रकल्प खर्च: ₹१.२ कोटी
वार्षिक ऊर्जा बचत: अंदाजे ₹४८ लाख
कार्बन उत्सर्जन कपात: अंदाजे ४३५ मेट्रिक टन
हा प्रकल्प एप्रिल २०२४ मध्ये व्यवहार्यता अभ्यास आणि अंदाजपत्रक प्रक्रियेनंतर सुरू झाला, तर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ झाला. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) आर्थिक सहाय्यामुळे (CFA) हा प्रकल्प अधिक व्यवहार्य ठरला.
हेही वाचा – चाकणच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार
शाश्वततेची बांधिलकी:
कल्पतरू हार्मनी सीएचएसने यापूर्वी ‘एस.ओ.आर.टी’ कचरा व्यवस्थापन उपक्रमासाठी ग्रीन अॅम्बेसेडर सन्मान मिळवला आहे. याशिवाय, सोसायटीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) अद्ययावत करून दररोज ३ लाख लिटर सांडपाण्याचे पुनर्वापर करण्याची क्षमता विकसित केली आहे.
प्रेरणादायी पाऊल:
कल्पतरू हार्मनी सीएचएसचा हा सौर प्रकल्प आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी निवासी सोसायट्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. ऊर्जा स्वातंत्र्य आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांना देखील प्रोत्साहित करेल, अशी अपेक्षा आहे.