Important News : चिंचवड विधानसभेतील रावेत ते वाकड भागात वाढणार ‘कनेक्टिव्हीटी’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते विविध रस्त्यांचे भूमिपूजन : भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे विकासाचे ‘व्हिजन’
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे आणि वाकड भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गालगत झपाट्याने विकसित होणाऱ्या या गावांतील ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे. या रस्त्यांना गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघासह शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील मामुर्डी किवळे येथील १८ मीटर व १२ मीटर डी.पी. रस्ता, किवळे व रावेत हद्दीवरील १८ मीटर डी.पी. व इतर रस्ते, मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंपपर्यंत डी.पी. रस्ता, प्रभाग क्रमांक २५ मधील पुनावळे येथील मुंबई-बंगळुरू हायवेपासून काटेवस्तीकडे जाणारा ३० मीटर डी.पी. रस्ता, कोयते वस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८ मी. डी.पी. रस्ता, ताथवडे गावातून जीवननगरमार्गे एमटीयू कंपनीकडे जाणारा १८ मी. डी.पी. रस्ता, पुनावळे बी. आर.टी. रोडपासून पुनावळे गावठाणातून जाणारा १८ मी. रुंद डी.पी. रस्ता, गायकवाडनगरमधील १८ मी. रुंद डी.पी. रस्त्याची स्थापत्य विषयक कामे यासह वाकड येथील टिपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८ मी. डी.पी. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासह सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौके येथे सब-वे बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
सोसायटीधारक, आयटीएन्सला दिलासा…
रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड या पट्टयामध्ये हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीएन्स मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजुला गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये लोकवस्ती प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रस्त्यांच्या विकासकामांमुळे वाहतुककोंडी कमी होणार असून, रहिवाशांची सोय होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. वाकड भागातील भूमकर चौक व भुजबळ चौकामधील रस्त्याच्या बांधणीनंतर सध्या होणाऱ्या वाहतूक कोंडीस शहरवासीयांना सामोरे जावे लागणार नाही. सदर विविध रस्त्यांच्या विकास योजनांमुळे सुनियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण होणार आहे. नागरिकांना आरामदायी प्रवास, दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते, सुरक्षित पदपथ (पेडेस्ट्रीयन फ्रेंडली फुटपाथ) उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सोसयटीधारक, आयटीएन्सला दिलासा मिळाला आहे.
वाढते नागरीकरण आणि वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विकास आराखड्याप्रमाणे विविध रस्ते विकसित करण्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत आहोत. रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना आता चालना मिळाली आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्ते विकसित करताना भूसंपादन हा प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित राहतात. मात्र, आगामी काळात दळणवळणाची स्थिती सुधारण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करणार आहे. प्रशासनाने सदर रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.






