कपड्यांचे दुकान फोडून 60 हजारांचे कपडे आणि चपला चोरीला
पिंपरी चिंचवड | कपड्यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 60 हजारांचे कपडे आणि चपला चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजता मावळ तालुक्यातील शिवणे येथे उघडकीस आली.
प्रथमेश कैलास गायकवाड (वय 30, रा. शिवणे, ता. मावळ) यांनी याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांचे शिवणे गावात अॅटीट्यूड मेन्स वेअर नावाचे कपड्याचे दुकान आहे. शनिवारी (दि. 17) दुपारी दोन वाजता गायकवाड यांनी त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून, वाकवून त्या वाटे दुकानात प्रवेश केला.
त्यानंतर दुकानातून 60 हजार रुपयांचे कपडे आणि चपला चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.





