खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण नागरिकांनी गाठले महावितरण कार्यालय!
कुदळवाडी, बालघरे वस्तीमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या

पिंपरी चिंचवड : कुदळवाडीतील बालघरे वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवरून संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना तक्रारींचा पाढा वाचत तातडीने खंडित वीस पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.
कुदळवाडीतील रहिवासी आणि स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या वतीने महावितरणकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरणचे उपअभियंता राजेश भगत यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या व वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केली.या वेळी जंयवत बालघरे, उत्तम बालघरे, सागर बालघरे, अनिकेत लांडगे, धनपत यादव, दीपक घन, स्वराज पिंजण, रोहिदास वाघमारे,विशाल बनसोडे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
महावितरणला दिलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे या भागामध्ये वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज येणे, अचानक ट्रिपिंग अशा समस्या भेडसावत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, लघुउद्योग आणि दैनंदिन घरगुती कामांवर परिणाम होत आहे.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
महावितरण अधिकारी राजेश भगत यांनी लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले. स्थानिकांनी त्यांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले असून, लवकरच या समस्येचे समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





