मित्राचा खून करणा-या चौघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी
भोसरी मधील धावडेवस्ती येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार 27 जानेवारी रोजी उघडकीस आला. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील आरोपींना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
नामदेव शिवाजी शिंदे (वय 24, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा. याकतपुर, ता. औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (वय 22, रा. धावडे वस्ती, भोसरी), आकाश अशोक सरदार (वय 24, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश शिवाजी गडकर (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. औसा, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. 27 जानेवारी रोजी धावडे वस्ती भोसरी येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. त्या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथकाने सुरु केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनी सुरु केली. त्यात काही मुले घटनास्थळी दारू पिलेली आढळून आली. सदगुरुनगर येथे एका सराईत गुन्हेगाराची झडती घेत असताना नामदेव शिंदे हा उशिरापर्यंत झोपलेल्या स्थितीत आढळला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून गणेश गडकर याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली आहे.
आरोपी नामदेव शिंदे आणि मयत गणेश गडकर हे मित्र असून नामदेव याच्या मोबाईल मध्ये गणेशचे फोटो तसेच सेल्फी देखील पोलिसांना आढळून आली आहे. आरोपी आणि मयत हे एकाच जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यात आपसात वाद होता. गणेश याचा काटा काढण्याच्या उद्देशाने नामदेव याने त्याला 27 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता जनता गॅरेज जवळ बोलावून घेतले. तिथे गणेश सोबत वाद घालत असताना नामदेव याच्या पॅन्टचे बटण तुटले आणि त्याची पॅन्ट खाली सरकली. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि त्याने गणेशला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून डोके दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गणेशचा मृतदेह तब्बल 40 फूट फरफटत नेऊन गॅरेजमधील दोन गाड्यांच्या मध्ये फेकून दिला.
कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री पद्माकर घनवट, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी मंगेश भांगे, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, राहुल खारगे, नितीन लोखंडे, आशिष बनकर, गणेश हिंगे, सागर शेडगे, गणेश कोकणे, समीर रासकर, F विनोद वीर, गणेश सावंत, सुमीत देवकर, अमर कदम, प्रविण माने, नागेश प्रभाकर माळी, प्रविण कांबळे, राजेंद्र शिंदे, चिंतामण सुपे, औंदुबर रोंगे यांचे पथकाने केली आहे.





