अग्निशामक जवानाचा ऑनड्युटी मृत्यू
चोविसावाडी फायर स्टेशनमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता

पिंपरी चिंचवड :शहरातील चोविसावाडी फायर स्टेशन येथे मंगळवारी (दि. २८) सायंकाळी व्यायाम करत असताना अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. तनिष्क पार्क सोसायटी, चर्होली) असे मृत जवानाचे नाव आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजेश राऊत हे नेहमीप्रमाणे फायर स्टेशनमधील जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने “थोडावेळ आराम करतो” असे सांगून ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
हेही वाचा – नकुल भोइर खून प्रकरणी पत्नीचा प्रियकरही अटकेत
सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे अग्निशामक दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
पाच महिन्यांपूर्वी झाला होता भरती
मयत राजेश राऊत हा पाच महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाला होता. त्यावेळी त्याची शाररिक तपासणीही झाली होती. मात्र त्यामध्ये त्यास हृदयविकाराचा कोणताच आजार आढळून आला नव्हता.




