सरकारी जागेतील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड | सरकारी जागेतील 28 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सरदार वल्लभाई पटेल बॅडमिंटन हॉल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.दयानंद जगन्नाथ चव्हाण (वय 54, रा. विशाल नगर, पिंपळे निलख) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 12) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आझाद (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे सरदार वल्लभाई पटेल बॅडमिंटन हॉल आहे. या परिसरातील आरोपींनी 28 झाडांची कत्तल केली. यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तोडलेल्या झाडांपैकी 15 हजार रुपयांचे लाकूड आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरले. यासाठी आरोपींनी उद्यान विभागाची परवानगी घेतली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.





