पत्नी, मुलांची माफी मागत संपविले जीवन
सावकारी छळ : महिलेसह चार जणांच्या विरोधात गुन्हा

पिंपरी | मला माफ करा… अशी पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगरमध्ये घडली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओद्वारे सावकारांनी दिलेल्या त्रासाची वैâफियत मांडली.
राजू नारायण राजभर (वय ४५, रा. साईबाबानगर, चिंचवड स्टेशन) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर (वय १९) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे (रा. घरकुल सोसायटी, चिखली), महादेव फुले (रा. आनंदनगर चिंचवड स्टेशन), राजीवकुमार ऊर्फ गुड्डु भैया (रा. पिंपळे सौदागर) आणि महीला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – पिझ्झामध्ये आढळला तुटलेल्या चाकूचा तुकडा, भोसरीतील प्रकारामुळे खळबळ
फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसून तुला मारु, तुला कापून टाकू, अशा वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांमुळे राजू सतत तणावात होते. हा तणाव असह्य झाल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
आत्महत्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
राजू राजबर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी साडेपाच मिनिटांचा एक व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबस सविस्तर कथन केले आहे. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफीही मागितली आहे. तसेच, दोन पानांची एक चिठ्ठीही लिहिली आहे. डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा मांडणार्या राजू यांचा व्हिडीओ हृ्दय पिळवटून टाकणारा आहे. त्याचा व्हिडीओ आणि चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.