लोणावळ्यात मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोन तरुणांना उडविले, एकाचा जागीच मृत्यू
एक जण गंभीर जखमी; संतप्त नागरिकांनी स्कॉर्पिओ जाळली

लोणावळा : लोणावळ्यात वर्षाविहार व पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओ कारने कठड्यावर बसलेल्या लोणावळ्यातील दोन तरुणांना त्यांच्या स्कुटीसह उडविले. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हि घटना लोणावळ्यातील सहारा पुलाजवळ रविवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी स्कॉर्पिओ जाळून भस्मसात केली. लोणावळा शहर पोलिसांनी संबंधित मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक उल्हास चिंचणकर (वय-२०, रा. भैरवनाथनगर कुसगाव बुद्रूक, लोणावळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव असून, आयान मोहम्मद शेख (वय-१७, रा. भैरवनाथनगर, कुसगाव बुद्रूक, लोणावळा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तुलसीराम रामपाल यादव (वय-३२, वडाळा पुर्व, मुंबई) असे स्कॉर्पिओ चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल सुर्यकांत चिंचणकर (वय-५३, रा. भैरवनाथनगर, कुसगाव बुद्रूक, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा – एसटी प्रवाशांना आनंदाची बातमी, तिकीट दरात इतकी सुट, ST महामंडळाची नवी योजना १ जुलैपासून लागू…
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टी असल्यामुळे मुंबईतील चार मित्र लोणावळ्यात त्यांच्या मित्राच्या स्कॉर्पिओ कारने (क्रमांक-युपी-८०/डीसी-९०००) वर्षाविहार व पावसाळी पर्यटनासाठी आले होते. कारमधील तरुण हे लोणावळ्यातील सहारा पुलावर आल्यावर तेथील वातावरण पहावून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारमधील तरुणांनी धांगडधिंगा घालू लागले. या दरम्यान त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ कार सहारा पुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या जागेत येथील मिस्टी मेडोज हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर सुसाट वेगात नेली. यावेळी या रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर बसलेल्या लोणावळ्यातील दोन तरुणांना त्यांच्या स्कुटीसह स्कार्पिओने धडक देऊन उडविले. या घटनेत कार्तिक चिंचणकर हा जोरात बाजूलाच असलेल्या एका विजेच्या खांबावर फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र आयान शेख हा गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्कॉर्पिओ चालकासह कारमधील तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तर जखमीला तत्काळ उपचारासाठी रवाना केले.
दरम्यान पोलिस घटनास्थळावरून माघारी गेल्यानंतर संतप्त अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओला पेटवून दिले. आगीत संपूर्ण स्कॉर्पिओ कार जळून भस्मसात झाली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहराच्या सहायक पोलिस निरीक्षक दिपाली पाटील या करीत आहेत.