Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीतील लघुउद्योग पुनर्वसनासाठी औद्योगिक पार्क विकसित करा!

लघु उद्योजक संघटनेची मागणी : विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

मुंबई | कुदळवाडी, चिखली येथील लघुउद्योगांवर झालेल्या अचानक निष्कासन कारवाईनंतर उद्‌योजक आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने औद्योगिक पार्क विकसित करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपसभापती अण्णा बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या पार्श्वभूमीवर विधान भवन, मुंबई येथे अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत लघुउद्योग संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, भरत नरवडे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे आदी उपस्थित होते.

कुदळवाडी आणि चिखली परिसरातील अनेक लघुउद्योग गेल्या २५–३० र्षांपासून ग्रामपंचायतीच्या परवान्यानुसार व्यवसाय करत होते. मात्र, १२ जानेवारी २०२५ रोजी महापालिकेने केवळ १५ दिवसांची नोटीस देत बांधकाम निष्कासनाची कारवाई जाहीर केली. ८ फेब्रुवारीपासून सकाळी ६ वाजल्यापासून अचानकपणे कारवाई सुरू झाली. यामध्ये CNC, VMC यांसारखी महागडी यंत्रसामग्री, ऑफिसमधील महत्त्वाचे कागदपत्रे काढून घेण्यासही वेळ न देता मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक यंत्रांवर थेट राडारोडा टाकून नुकसान करण्यात आले.

हेही वाचा    :        नाशिक फाटा ते खेड एलिव्हेडेट कॉरिडॉर भूसंपादनासाठी राज्य सरकारचा निधी

महत्त्वाचे म्हणजे, कारवाईपूर्वी महापालिकेने या परिसरात दहशतवादी आणि रोहिंग्यांचा वावर असल्याचा आक्षेप घेतला, तसेच नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु प्रत्यक्षात कोणतेही पुरावे न सापडता सरसकट निष्कासन करण्यात आले. यामुळे अनेक उद्योजक देशोधडीला लागले असून, कर्जाचे हप्ते भरणेही अशक्य बनले आहे.

औद्योगिक महामंडळाकडे सध्या मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत, तसेच प्रचंड वाढलेले दर हे नवीन जागा घेण्यास अडथळा ठरत आहेत. चाकण परिसरात कामगार मिळविणे अवघड झाले असून, वाहतूक कोंडीही मोठा प्रश्न बनली आहे.

संघटनेने केली मुख्य मागणी अशी

चिखली परिसरातील उद्योजकांच्या मालकीच्या जमिनीवर महापालिकेने औद्योगिक झोन विकसित करावा, त्याठिकाणी औद्योगिक पार्क उभारून पायाभूत सुविधा (CEPT, STP, रोड, ड्रेनेज, वीज, पथदिवे) द्याव्यात. नुकसानग्रस्त उद्योजकांना महापालिका व राज्य सरकारकडून आर्थिक भरपाई मिळावी. निष्कासन दरम्यान महावितरणकडून बंद केलेले वीज मीटर पुन्हा त्वरित जोडण्यात यावेत आणि दुप्पट सुरक्षा ठेव घेऊ नये, अशी मागणी लघु उद्योजकांनी केली आहे.

उपसभापती आण्णा बनसोडे यांचे याचे आश्वासन

यासंदर्भात अण्णा बनसोडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने वीज मीटर जोडण्याचे निर्देश दिले. तसेच, सकारात्मक भूमिका घेत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालिका अधिकारी, नगरविकास विभाग आणि लघुउद्योग संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button