सदनिका ताबा लवकर मिळणेसह विविध मागण्यांसाठी म्हाडाच्या तळेगाव लाभार्थ्यांची गृहनिर्माण भवनासमोर निदर्शने
![Flats, possession, including early acquisition, for various demands, Mhada, Talegaon beneficiaries, housing, demonstrations in front of buildings,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/mhada-talegaon-780x470.png)
तळेगावः
‘अडीच लाख माफ झालेच पाहिजे’, ‘१० टक्के सवलत मिळाली पाहिजे’, ‘ताबा लवकरात लवकर मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा देत, आम्हाला आमच्या हक्काच्या सदनिकेचा ताबा लवकरात लवकर द्यावा, सर्व सदनिकाधारकांना रेरा नियमाप्रमाणे मुदतीत ताबा द्यावा, अशी मागणी करत म्हाडा प्रकल्प तळेगाव दाभाडेच्या लाभार्थ्यांनी शुक्रवारी (ता. ७ जुलै) रोजी गृहनिर्माण भवनासमोर निदर्शने केली.
पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे (म्हाडा) तळेगाव दाभाडेची २०१८ ची सोडती काढण्यात आली होती. ही योजना अल्प उत्पन्न गट, मागासवर्गीय यांच्या राहण्यासाठी आहे. त्या सोडतीच्या जाहिरातीत घराची किंमत १४ लाख रुपये होती. मात्र; अचानक ‘म्हाडा’ने अडीच लाख रुपये वाढवून १६ लाख ५० हजार किंमत केली आहे. तसेच अद्याप सदनिकेचा ताबा मिळालेला नाही. सर्व सदनिका धारकांना रेरा नियमा प्रमाणे मुदतीत ताबा देण्यात यावा.
याविषयी म्हाडाच्या पदाधिकाऱ्यांना ३ वेळा पत्र व्यवहार केला आहे. आता ज्यांनी ६ हजार भरून सदनिका बुक केली आहे. अशा लाभार्थ्यांना अडीच लाखाचा दंड बसणार आहे. तसेच ज्यांनी १० लाख भरले आहेत. अशा सदनिकाधारकांना दंडातून वगळले आहे. सर्व मुद्दे तत्काळ सदनिकाधारकां निर्णय घेऊन प्रश्न सोडविण्यात यावे, अशी मागणी केली.
या आहेत मागण्या
- सदनिका ताबा लवकर मिळणेबाबत.
- म्हाडा घरकूल वसाहतीचा रजिस्ट्रेशन कधी होणार, ते लेखी स्वरूपात देण्यात यावे.
- बँकेचे इएमआय लवकर चालू करण्यात यावे. (बँकेसोबत असे पत्र देण्यात यावे)
- १० टक्के सवलत मिळण्याबाबत. (ज्या सदनिका धारकांनी ९० टक्के रक्कम भरलेली आहे)
- दंड आकारणी माफ करणे बाबत.
- सदनिका रक्कम सात दिवसामध्ये वैयक्तिक ई – मेल आणि फोनवर कळवण्यात यावे.