देहू पालखी मार्गाची दुरवस्था गंभीर: वारकऱ्यांचा प्रवास धोक्यात
खड्डे, पाणी साचणे आणि अपूर्ण सुविधा; तात्काळ दुरुस्तीची नगरसेविकेची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
देहू पालखी मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाढलेले खड्डे, धुळीचे लोट आणि अपूर्ण नागरी सुविधांमुळे नागरिक व वारकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नगरसेविकेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देहू पालखी मार्ग हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि शहरातील दैनंदिन वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, आणि अपूर्ण निचरा व्यवस्थेमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पदपथ, स्ट्रीट लाईट, स्वच्छता व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा – राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक
या पार्श्वभूमीवर नगरसेविकेने पुढील तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे: रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण युद्धपातळीवर करणे, सर्व खड्डे तात्काळ भरणे पावसाळ्यापूर्वी निचरा व्यवस्था सुधारणे, पदपथ व स्ट्रीट लाईटची व्यवस्था पूर्ण करणे, परिसरातील स्वच्छता व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या दुरुस्तीला आता वेग देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“देहू पालखी मार्ग हा श्रद्धेचा आणि लाखो वारकऱ्यांच्या भावनांचा मार्ग आहे. त्याची सध्याची अवस्था अत्यंत वेदनादायक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वारकऱ्यांच्या सन्मानासाठी या रस्त्याचे तात्काळ दर्जेदार डांबरीकरण आणि सर्व मूलभूत सुविधा युद्धपातळीवर पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे.
– ऐश्वर्या तरस, नगरसेविका, शिवसेना.





