चिखली प्राधिकरणामध्ये दूषित पाणीपुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
कायमस्वरूपी मार्ग काढण्याची पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन तथा भाजपा पदाधिकारी शिवराज लांडगे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चिखली प्राधिकरण परिसरातील सेक्टर 4 ते 13 मधील अनेक सोसायट्यांना गेल्या काही दिवसांपासून दूषित व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, विशेषतः सेक्टर 11 ते 13 या भागात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे अनेक नागरिक आजारी पडल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवराज लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्री. ओबासे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत सेक्टर 11 ते 13 मधील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंत्यांनी सध्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून पुरवठा होणारे पाणी शुद्ध असल्याचे सांगितले. मात्र ज्या ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत, त्या भागात महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन पाण्याचे नमुने घेतील आणि त्याची तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता डिसेंबरपर्यंत ६०% निधी खर्च करणे बंधनकारक

पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषित पाणीपुरवठ्याच्या संदर्भात नुकतीच राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी शहरातील पवना व इंद्रायणी नद्यांच्या विविध बंधाऱ्यांची पाहणी करून प्रदूषणाबद्दल आढावा घेतला व संबंधित विभागाला सुचनाही केल्या, यावेळी शहराला सुरक्षित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्यासह शहरातील विविध नेत्यांनी पंकजा मुंडे यांना विविध उपाययोजना सुचविल्या.
पण सध्या चिखली परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर चिखली प्राधिकरणातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“सेक्टर 11 ते 13 या भागात अलीकडे अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी आणि काही सोसायटी धारकांनी महानगरपालिकेत जाऊन मुख्य अभियंत्यांसोबत चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत या परिसरात पाण्याची तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र दोन दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.”
– शिवराज लांडगे, भाजपा मंडल अध्यक्ष





