शिक्षक दिनी विधायक उपक्रम: राष्ट्रनिर्मात्यांचा घरी जाऊन सन्मान!
प्रभाग क्र. ८ मध्ये २९१ शिक्षकांचा आगळावेगळ्या पद्धतीने सत्कार
पिंपरी-चिंचवड : शिक्षक दिनाच्या औचित्याने प्रभाग क्र. ८ मध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे व इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निलम शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने, परिसरातील तब्बल २९१ शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. मात्र, यंदा केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता थेट शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिक्षकांमध्येही या उपक्रमाविषयी विशेष आनंद आणि समाधान दिसून आले.
शिक्षकांना त्यांच्या घरी भेट देऊन, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक भाजपा कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते.
उपक्रमाचे नागरिकांमधून कौतूक…
शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसून, समाजाला दिशा देणारे व राष्ट्रनिर्माणात मोलाची भूमिका बजावणारे असतात. बदलत्या काळातही त्यांनी शिक्षणाचा ध्यास न सोडता, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य निःस्वार्थपणे केले आहे. हीच जाणीव लक्षात घेऊन, शिक्षकांचा थेट त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षकदिनाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम अन्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
“शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नाहीत, तर समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांचं योगदान फक्त वर्गातच नाही, तर पिढ्यांना घडवण्यात असतं. म्हणूनच शिक्षकांचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असावा, अशी आमची भावना आहे.”
— शिवराज लांडगे, मंडल अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी.





