‘१० एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करा’; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

लोणावळा : मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांच्यासह तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
आमदार सुनील शेळके यांनी जानेवारी महिन्यात लोणावळा शहरात जनसंवाद दौरा रॅली काढली होती. यावेळी शहरातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या होत्या. तदनंतर आमदार शेळके यांनी लोणावळा नगर परिषद प्रशासनासोबत बैठक घेत प्रलंबित विकासकामे व नागरी समस्यांचा आढावा घेतला होता व अनेक महत्वाच्या प्रश्नांवर वेळेत काम करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. यासह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील स्थानिक प्रशासनास विकासकामांसदर्भात कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
परंतु त्यानंतरही शहरातील कामे अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने आमदार शेळके यांनी काही दिवसांपूर्वी लोणावळा नगरपरिषदेत पुन्हा बैठक घेत नाराजी व्यक्त केली होती, तसेच शहरातील सर्व विकासकामे वेळेत मार्गी लावण्याच्या व नागरी समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यादरम्यान शहरातील टपरी धारकांचा मुद्दा ऐरणीवर आला. तसेच भांगरवाडी रेल्वे उड्डाण पूल, खंडाळा तलावाजवळील नागरिकांच्या घराचा मुद्दा असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने शुक्रवारी (दि.७) जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात तालुक्यातील सर्वच महत्वाच्या प्रश्नांबाबत, रखडलेल्या विकास कामांबाबत व नागरी समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली.
हेही वाचा – उष्माघाताच्या धोक्यात वाढ! राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना सुरु
लोणावळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाबाबत सदर बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या बैठकीनुसार दहा मार्चपूर्वी काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात तशी कोणतीही हालचाल दिसून आली नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच, मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्नावर तोडगा काढून येत्या १० एप्रिलपर्यंत भूसंपादन व इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लोणावळा शहरातील अनेक नागरी प्रश्नांवर बैठकीत तोडगा काढण्यात आला. यात खंडाळा तलावा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठीचा सर्वे एका आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला. तसेच खंडाळा येथील शाळेची उर्वरीत रक्कम भरण्याबाबत भू-संपादन अधिकारी यांनी आठ दिवसांत व्हॅल्युएशन करून नगरपरिषदेला कळवण्याचे आदेश दिले.
लोणावळा शहरातील भोंडे हायस्कूल यांना नगर परिषदेची शाळा सामंजस्य करार करून भाडेतत्त्वावर देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. तसेच अंतर्गत नूतनीकरण शाळेने करावे आणि लोणावळ्यातील नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सदर शाळेत विज्ञान विषयक शिक्षण द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
देहू नगर पंचायत हद्दीत गायरान जागेबाबत देहू नगर पंचायतीने घन कचरा व्यवस्थापन, नगर पंचायत इमारत, क्रीडांगण आणि रुग्णालय यासाठी लागणारी जागा, याबाबतचा प्रस्तावर लवकर तयार करून सादर करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनास जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासह तळेगाव दाभाडे शहरातील प्रलंबित शासकीय वसतीगृहाच्या जागेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.