CM फडणवीसांकडून घराणेशाहीला ‘‘ब्रेक’’ पिंपरी-चिंचवडमध्ये काय?
मिशन- PCMC : आमदार लांडगे यांचे बंधू, आमदार खापरे यांच्या मुलाचा पत्ता कट?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यातच ‘‘आमदार- खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाही..’’ अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्याचे स्वागत महाराष्ट्रभरात होते आहे. ( घराणेशाही )
राज्यातील राजकारणामध्ये राजकीय घराण्यांचा प्रचंड पगडा आहे. मुलगा, सून, नातू, पणतू असा राजकीय वारसा चालवला जातो. मात्र, यावेळी भाजपात घराणेशाही चालणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत.
पुणे महानगरपालिकेसाठी भाजपाने आमदार, खासदार यांच्या मुलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी तर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या अगोदर भाजपने गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी अशाच प्रकारे घराणेशाहीला डावललं होतं. या निर्णयाला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांच्या घरामध्ये उमेदवारी देणे भाजपला महागात पडले होते. त्यात अनेकांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपने घराणेशाहीला नाकारण्यचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे चित्र होते. तसेच, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप खापरे प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे लांडगे आणि खापरे यांना CM फडणवीस यांचा नियम लागू होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




